दीपके यांच्या निवासस्थानी पालकमंत्र्यांची भेट
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या निवासस्थानी राज्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी (दि. २६) भेट दिली. अभिजित यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून, त्यांना योग्य ती सुरक्षा मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
नीट पेपरफुटी प्रकरणात 'जेन झी'च्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. या यशस्वी आंदोलनात अभिजित दीपके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिरसाट यांनी दीपके यांच्या घरी जाऊन त्यांचे आई-वडील भगवान दीपके आणि अनिता दीपके यांची भेट
घेतली व प्रकृतीची आस्थापूर्वक विचारपूस केली.
मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार विषय
माध्यमांशी बोलताना पालकमंत्री शिरसाट म्हणाले, आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जमुळे अभिजित यांच्या आई-वडिलांना त्यांच्या सुरक्षेची मोठी चिंता वाटत होती. दीपके कुटुंबाशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आंदोलनाला कोणतेही राजकीय वळण लागू नये, म्हणून मी आधी भेट देणे टाळले होते. मात्र, आता सरकार अभिजित यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेईल. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा विषय गांभीर्याने मांडणार आहे. या भेटीदरम्यान सुदाम जाधव, नरेंद्र त्रिभुवन, रमेश दाभाडे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













